आज खूप दिवसांनी खरतर महिन्यांनी मी ब्लोगवर लिहिते आहे. एरवी लिहीत होते पण ते ब्लोगवर उतरवायचा कंटाळा केला. शिवाय बऱ्याच पोस्ट तर तश्याच अर्धवट लिहिलेल्या पडून आहे. पूर्ण केल्याच नाहीत. त्यातले बरेच विषय आता जुनेदेखील झाले. हा लेख पण मी १३ डिसेंबर १० ला लिहिला आहे. पण आज येथे उतरवते आहे तसा चा तसा. लेख घटनेवर आहे म्हणून थोडा विस्कळीत वाटेल कदाचित .
कधी कधी मन फार अस्वस्थ होत. उगाच काहीतरी विचार करत बसत. सगळ्याच गोष्टींचा अर्थ कळेनासा होतो. कोणत्याच गोष्टीवर आपला म्हणावा तसा हक्क नाही अस वाटत. आणि मनाला काय अगदी साधी छोटी घटना देखील पुरते विचार करायला. अशीच घटना म्हणजे – काल परवाच आमच्या अपार्टमेंट मध्ये काहीतरी योगावरती कार्यक्रम होता. म्हणून एक मुलगा ( साधारण माझ्याच वयाचा) सगळ्यांकडे दोन – दोन तीन – तीन वेळा घरी जाऊन बोलवत होता. अगदी सर्वसामान्य किंवा म्हटलं तर गरीब घराचा वाटत होता. तस पाहिलं तर फक्त एक दोन सेकंदांसाठी पाहिलं असेन त्याला पण तेवढ पुरेस होत मनाला विचार करायला भाग पडायला. लगेच डोक्यात विचार यायला लागतात.
दोन व्यक्ती समोरासमोर साधारण सारख्याच वयाच्या. तरीही दोघांच्या जगण्यात, आयुष्यात किती फरक असावा. अशी किती लोक असतात जगात ज्यांना दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आयुष्यात कसलीही शाश्वती नाही. राहायला घर नाही . आता त्या जीवांना पण चांगला आयुष्य जगावस वाटत असणारच ना. पण दैव , नशीब कितीही नाही म्हटलं तरी असतच शेवटी. कोणत्या घरात जन्म घ्यायचा हे काय आपण ठरवतो? आपण चांगल्या घरात जन्म घेतला त्यात आपलं कर्तुत्व ते काय? देवान् दोन हात दोन पाय धडधाकट शरीर दिलय यात आपण कुठे काही केलय. मग इतर काही कम नशिबी माणसाना दुखावण्याचा हक्क आपल्याला दिला कुणी ? तरीही खूप लोक असतात ज्यांना दुसर्याना हिणवायला आवडत. त्यांच्या व्यंगाची टर उडवायला आवडत. पण अशा वेळी स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी तेवून विचार करायला हवा न. खूप लोकांना हे जमतच नाही.
कदाचित सगळ्यांनाच हे जमण शक्य होणार नाही. तस झाल तर या जगात कोणी कोणाला दुखवायच्या आधी कमीत कमी दहा वेळा तरी विचार करेल. असो, चालायचं.


