थोडेसे मनातले…


थोडेसे मनातले लिहायला म्हणून ब्लॉग सुरु केला पण मनाचा होता होता जनाचा कधी झाला कळलच नाही. स्वतःसाठी लिहिणं बंद झाल आणि व्यक्त होण्याच समाधानही संपलं. लिहिण्याचा मूळ उद्देश बाजूला पडून ‘ब्लॉग’ लिहिणं सुरु झालं. ब्लॉग आपल्यासाठी न राहता इतरांचा झाला, काही लिहिण्या आधी हे कितपत चांगल वाटतंय, बर जमतंय ना याचा विचार सुरु झाला. ब्लॉगवर लिहिण्याकरता योग्य विषय शोधण्याच्या नादात सगळच लिहिणं बंद पडल. पण लिहिणं बंद पडल, व्यक्त होण संपल आणि गुदमरणं कधी सुरु झाल कळलंच नाही.

हे सगळ चावून अक्षरशः चोथा झालंय. लिहायला पुन्हा सुरुवात करायची अस ठरवायचं, जुन्या पोस्ट पुन्हा वाचायच्या, अरेच्या हे आपणच लिहील होत का असा आश्चर्याचा सूर काढायचा, आता का जमत नाही अस काही लिहायला अस वाटून जरा हळहळायच आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, पहिले पाढे पंचावन्न.. हे दुष्टचक्र काही संपत नाही. अशावेळी अभिमन्यू असण्याचा फील येतो उगाच..

पण स्वानुभव सांगते, लिहिणं बंद पडल ना कि माणूस स्वतःपासून खूप दूर जातो, पण कधी कधी लिहिण्याकडे पुन्हा वळायला आधी स्वतःपासून तुटाव लागत. गालिब म्हणे रात्र रात्र जागून शेर रचे आणि प्रत्येक शेर साठी उपरण्याला गाठ मारत असे. सकाळी उठल कि एक एक गाठ सोडत जायची आणि शेर उतरवून काढायचा. स्वतःपर्यंत पोहोचण्याचा मार्गही कधी कधी फार खाच खळग्यांतून जातो.

भूतकाळात सोडलेल्या गोष्टी हरवल्या सारख्या वाटतात. पण भूतकाळाला जागेवरून हलण्याची मुभा नसते. भूतकाळ आपल्यासाठी कधीच हरवत नाही, खरतर आपणच भूतकाळासाठी हरवत असतो.

असो, काही दुष्टचक्र मोडून काढणं फार कठीण असत, पण आयुष्यात कोणाचाही अभिमन्यू होऊ नये..


आले मी पुन्हा, या समुद्रकिनारी
जरा गप्पा मारुयात, नेहमीसारख्या
पण  गप्पा कसल्या त्या
मीच बोलत असते सारखी
आणि तु मात्र गप्प
त्या सागराच्या साक्षीने
निवांत पणे ऐकत राहतोस सारं काही
आणि मी
होत राहते रिती
कुठेही, अगदी कुठेही वाहणारी नदी
जशी या समुद्राकडे विसावा शोधते ना
तसं, अगदी तसं
माझी सगळी सुख, दुख,
स्वप्न, अपेक्षा
सगळ्या तुझ्याचकडे विसावा शोधतात
मन कसं अगदी हलक हलक होतं.
मग,
चल, निघते मी असं म्हणून जरी मी दूर जात राहिले तरी
जशी सागराच्या ओढीने नदी वाहत येतेच,
तशी मीही परत फिरून इथेच येणार आहे
माझ्या या हक्काच्या विसाव्याकडे
हे तुला माहित असतच.
पण  एक प्रश्न मात्र नेहमीच मला सतावतो
कायमच हाकेच्या अंतरावर असणारा तु
नजरेच्या टप्प्यात मात्र कधीच का नसतोस ?
कधीच का नसत तुला नाव, चेहरा ?
असतं फक्त एक अस्तित्व
पुसटस, धुसर, तरीही जाणवणारं
असो,
नदीला तरी कुठे पुरी ओळख असते समुद्राची
तरीही ती धावतेच ना त्याच्या ओढीने
मीही येणारच आहे अशीच नेहमीच
या माझ्या स्वप्नातल्या
हक्काच्या विसाव्यापाशी
आणि
कधी न कधी दिसेलच मला तुझा चेहरा
स्पष्ट

प्रत्येक  माणसाला हवा असतो असा एक सोबती,
एक विसावा मनातलं सांगण्यासाठी, मोकळ होण्यासाठी
बऱ्याचदा हा चेहरा अस्पष्ट असतो, अंधुक असतो.
कधी त्याला आपल्याच जिवलग माणसाचा चेहरा असतो
तर कधी नीट निरखून पाहिलं तर आपलाच चेहरा त्यात दिसतो,
आणि असा माणूस जगात सर्वात एकटा असतो.

गुंता


काही नाती विणता विणता अगदी नकळत गुंता होतो, तो गुंता सोडवता सोडवता आपणही त्यात गुंतत जातो, इतके कि त्याचा गळ्याभोवती फास बसायला लागतो.

बर धागाच कापावा म्हटलं त्या धाग्यातच खरा जीव गुंतलेला…

म्हणजे कस ना धागा न कापता गुंता तसाच राहू द्यावा तरी गळफास बसून जीव जाणार आणि धागा कापावा तरी त्यातही जीव गुंतलेला म्हणून जीव जाणार, म्हणजे जीव जाणारच फक्त तो कसा जाणार एवढच ठरवण आपल्या हातात असतं.

व्यर्थच


जगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले
मरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले
नसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते
जगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले
काळासव घडले काही, जगण्यातून कळले काही
पण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले- जीवा

वळणांवरती …


ब्लॉग सुरु करून पाच वर्ष होत आलीत.
त्यापूर्वी महेंद्र काकांचा ‘काय वाटेल ते’, अनिकेत समुद्र यांचा ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आणि असे काही उत्तम ब्लॉग्स वाचनात आले होते. ते ब्लोग वाचता ब्लॉग वाचायची सवयच लागली. वेगवेगळे उत्तम ब्लॉग्स वाचनात आले आणि त्यावरच्या कथा, लेख रोज वाचले जाऊ लागले. हे ब्लॉग वाचता वाचता माझी लिखाणाची उर्मी जागृत झाली आणि रिकाम्या वेळेचा उद्योग म्हणून मी हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग हे मुक्त व्यासपीठ आहे तिथे चांगलच लिहिता आल पाहिजे असं नाही पण मनातल लिहील पाहिजे. म्हणून ब्लॉगला नाव दिलं ‘थोडेसे मनातले’.
बघता बघता हा रिकाम्या वेळेचा उद्योग न राहता पूर्ण वेळचा उद्योग झाला. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी मनात टिपायच्या आणि नंतर ब्लॉगवर उतरवायच्या. येत जाता ब्लॉग पाहणं सुरु झालं. आज ब्लॉग वर किती प्रतिक्रिया आल्या, किती टिचक्या पडल्या हे पहायची सवय जडली. बोलण्याला पर्याय म्हणून लिहिणं सुरु झालं आणि आभासी जगात नवी ओळख तयार झाली. माझ्या बाळबोध लिहिण्याला ही प्रतिक्रिया मिळायला लागल्या.
पण गेल्या काही काळापासून ब्लॉग मागे पडला आणि ‘थोडंसं मनातलं’ डायरीच्या दोन पानांमध्ये निपचित पडून राहायला लागलं. पुढे जाताना काही गोष्टी मागे सुटतात. पावलागणिक पायाखालची वाट बदलत असते. जुन्या गोष्टींची जागा नवीन गोष्टी घेतातच असे नाही. मनाचे काही कोपरे सदैव रिकामेच राहतात.
पुढे चालत राहणं आहे प्राक्तनाचा भाग जरी
तरीदेखील वळणांवरती उरून मागे राहणं होतं
पण आता ब्लॉग पुन्हा सुरु करावासा वाटतोय

 

अपूर्ण …


“सई सई उठ तुझा फोन वाजतोय. उठ लवकर.” तिला झोपेतच आईचा आवाज ऐकू आला.
आधी आई काहीतरी बोलतेय एवढच तिला कळल, शब्द कळून त्यांचा अर्थ लागायला थोडावेळ गेला. नंतर ती धडपडत उठली पण तोपर्यंत फोन बंद झाला होता. तिने फोन पहिला तर क्लास मधून फोन होता. तिने लगेच परत फोन लावला. पलिकडून मानसी बोलत होती. आजचा क्लास एक तास लवकर होणार आहे, लवकर ये अस सांगायला तिने फोन केला होता. तिने घड्याळात पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते. एक तास लवकर म्हणजे चार वाजता क्लास होणार. क्लासला पोहोचायलाच अर्धा पाउण तास लागणार. म्हणजे तीन वाजताच निघावं लागणार. ती जराशी चरफडतच उठली. नेहमीच आहे हे. अगदी वेळेवरच सांगतात नेहमी वेळ बदलल्याच. आधी नाही का सांगता येत. आता तयारी करायलाही वेळ मिळणार नाही. जाताना बसमधे वाचव लागणार. तिने चेहऱ्यावर थंड पाणी मारलं. भर उन्हाळ्याची रखरखीत दुपार. त्यात केव्हाची लाईट गेलेली. गरमीने आणि घामाने जीव अगदी नकोसा झालेला. त्यात पुन्हा गेल्या रात्र भरच जागरण. गेले वर्षभर ती प्रशासकीय सेवेसाठी मान मोडून अभ्यास करत होती. तिची चरफड साहजिकच होती.
नशिबाने आज बस लगेचच मिळाली. पोहोचायला वेळ होता म्हणून ती पुस्तक काढून बसली. थोडा वेळ झाला असेल वाचायला घेऊन तेवढ्यात कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज यायला लागला. मागच्या सीटवर कोणीतरी येऊन बसल असाव. तिने वळून पाहिलं नाही पण बहुतेक काही मित्र मैत्रिणींचा ग्रुप असावा. त्यांच्या बोलण्यावरून ते कुठे तरी फिरायला जायचा प्लान बनवत असावेत असा अंदाज तिने लावला. तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. तरी कानावर आवाज पडणारच, मेंदू त्यांचा अर्थ लावणारच आणि मग त्याचा नेहमीचाच उद्योग सुरु होणारच.
“किती सोप्पय ना रे तुमच्यासारख्यांच जगण. हव तेव्हा हव ते करायचं, हव तसं जगायचं. जस पक्ष्यांना हव तेव्हा हव तितक्या वेळ आकाशात उडता येत. तुमच्यासारख्यांच आकाश या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेलं, अमर्याद. आमच तसं नसत. आमच्या आकाशाला खूप मर्यादा पडतात. आमच आकाश छोटस, खिडकीतून दिसणाऱ्या छोट्याशा तुकड्या एवढ. तेव्हढ्याच आकाशात उडायचं चिटपाखरू होऊन, तेही जमल तरच. नाही तर तुमच्यासारख्यांना पाहायचं उडताना.“
थोडा वेळाने हसण्या खिदळण्याचा आवाज बंद झाला. त्यांना खाली उतरण्याची घाई असावी म्हणून ते सगळे बसच्या पुढच्या दाराकडे गेले आणि बस थांबताच खाली उतरले. बस पुढे गेली तशी तिने तिच्या पुस्तकाकडे नजर वळवली. पुढचा अर्धा तासात निदान एकदा तरी सगळ वाचून व्हायला हवं होतं. मुलांना शिकवण्याआधी शिकवणार्याला तर यायला हव ना सगळ.
ती क्लास मध्ये पोहोचली तेव्हा पाऊणे चार वाजले होते. क्लास सुरु व्हायला अजून १५ मिनिट बाकी होते. अजून वर्ग बराच रिकामा होता. पण काही मुल येऊन बसली होती. त्यातली काही अभ्यास करत होती आणि इतर गप्पा मारत बसली होती.
ती आत गेली तशी मुलांची आपापसातल्या गप्पांची भुणभुण बंद झाली. तिच्याशी गप्पा मारायला मुल नेहमीच उत्सुक असत, त्यातल्या त्यात अभ्यासू मुल जास्तच. ते तिच्याकडे अडलेले प्रश्न घेऊन येत आणि ती सोडवून द्यायला मदत करत असे. कधी कधी तर काही त्यांचे वैयक्तिक प्रश्नही तिला विचारत आणि ती त्यानाही जमेल तशी नीट उत्तरं देत असे. प्रश्न कोणताही असो, कितीही गुंता असू देत त्याला मोकळ करण्यात तिची हातोटी होती. अगदी सोप्या शब्दात तिला समजावून सांगता येत असे. म्हणूनच ती क्लास मध्ये विद्यार्थ्यांची आवडती होती.
आत जाता जाता तीच मनिषकडे लक्ष गेलं. कोणाचही फारस लक्ष जाणार नाही अशा शेवटच्या बाकावर बसून त्याच मोबाईलवर कोणाशी तरी बोलण चालू होत. तिने आत जाताच तिच्या हातातल्या वस्तू तिथल्या टेबल वर ठेवल्या. सगळ्यांकडे पाहून प्रसन्न हसली आणि ती मुलांमधल्या एका बाकावर जाऊन बसली. काही मुली लगेच तिच्याकडे वही घेऊन आल्या आणि तिच्या शेजारच्या बाकावर बसल्या. एक एक करून त्या तिला प्रश्न विचारत होत्या आणि ती त्यांना उत्तर देत होती. मधून मधून काही गोष्टींवर त्याचं हसणं खिदळणही चालू होत. तिच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक मोकळं मैत्रीच नात तिने जपल्याच कोणालाही कळल असत. हळू हळू इतरही मुल येऊन त्यांच्यात मिसळली.
प्रश्न सोडवता सोडवताही ती मधूनच एक नजर मनिषकडे टाकत होती. त्याच अजूनही फोनवर बोलण चालूच होत. ती त्याच्याकडे पाहतेय याकडे त्याच अजिबात लक्ष नव्हतं. एवढच काय आजूबाजूला चालू असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे त्याच अजिबात लक्ष नव्हत.
चार वाजत आले तशी ती उठली. तोपर्यंत सगळे विद्यार्थी आले होते आणि क्लास पूर्ण भरला होता. तिने फळा स्वच्छ पुसला आणि आज शिकवायचा विषय लिहायला सुरुवात केली. वर्गातली कुजबुज बंद होऊन सगळे आपापल्या वह्या पेन वगैरे काढून सरसावून बसले होते. ती वळली आणि तिने एकदा सगळ्यांकडे एक नजर फिरवली. एव्हाना मनीषही भानावर येऊन वही वर काढून बसला होता.

ती घरी आली तेव्हा आई बाहेर जाण्याच्या तयारीतच होती. आई बाहेर गेली तसा तिने तिच्यासाठी तयार करून ठेवलेला चहा उकळून घेतला आणि बाल्कनीत येऊन उभी राहिली. खर तर एरव्ही दोन तास क्लास आणि साधारण एक तासाचा प्रवास करून आल्यावरही तिला कधी थकवा जाणवत नसे. उलट क्लास मधून आल्यावर तिला मोकळ वाटत असे. तिच्यात आणि त्या मुलांत जवळ जवळ पाच वर्षाचं अंतर होत. पण तिथे शिकवायला लागल्याच्या काही महिन्यांच्या काळातच सगळ्यांशी तिची छान गट्टी जमली होती. त्यांच्यात जाऊन ती तीच वय विसरून, त्यांच्यात त्यांच्यासारख होऊन वावरत असे.
पण आज मात्र तिला जरा थकवा जाणवत होता. शारीरिक नव्हे पण मानसिक. गेल्या काही दिवसांपासून मनीषच बदललेलं वागण तिला खटकत होतं. त्याच ते सारख भान हरवल्यासारख फोन वर बोलत राहण, वर्गात नीट लक्ष न देण. त्याच्याविषयी इतर काही शिक्षकांकडून ऐकायला मिळालेल्या तक्रारी तिला आणखीनच अस्वस्थ करत.
“आजच मानसी सांगत होती काल मनीष तिच्या तासाला शेवटच्या बाकावर बसून काही तरी वेडवाकड बोलत होता आणि सगळी मुल त्याच्या बोलण्याला साद म्हणून फिदी फिदी हसत होती. हल्ली त्याच वागण खूपच विचित्र होत चाललय. मला त्याची फार काळजी वाटायला लागलीय.”
“असा नव्हता तो आधी. अगदी लहान होता तेव्हापासून ओळखते मी त्याला. मला माहितीये तो असा नाहीचे. आधी कधी साध उलट उत्तर देताना पाहिलं नाहीये मी त्याला. मग आता अचानकच गेल्या काही दिवसात अस काय बदललं असाव.”
“त्याच्या बद्दल त्याच्या कॉलेज मधूनही तक्रारी आल्याच काकू सांगत होत्या. हातचा सुटत चाललाय पोरगा म्हणत होत्या. त्याच्याशी बोलण्याचाही काही उपयोग होत नाही म्हणे. हल्ली घरातही फार थांबत नाही. अभ्यासच तर लांबच राहिलं. मला म्हणाल्या तू बोलून पहा, पहा तुला काही सांगतो का ते.”
“आज तू काही बोलणार नाहीएस का? मी एकटीच बडबडतेय किती वेळापासून. तू काहीच बोलत नाहीयेस. नुसता हसतोएस काय गालातल्या गालात.“
तेवढ्यात दाराची बेल वाजली. आई आली असावी बहुदा असा विचार करत तिने दार उघडल तर समोर मनीष. हातात वही घेऊन उभा होता.
साधारण १५ – १६ वर्षांचा गोरा गोमटा मुलगा. नुकताच मिसरूड फुटायला लागलेलं. नाकावर अगदी लहान वयापासून असलेला चष्मा त्याच्या अभ्यासुपणाच
“मनीष, आज इकडे?”
“काही नाही ग ताई, थोडं अभ्यासच अडलं होतं ते विचारायला आलो होतो. आहे ना वेळ तुझ्याकडे?” तिला जरा आश्चर्यच वाटल. आज बर्याच दिवसांनी मनीष तिच्याकडे अभ्यासाचा अडलेल विचारायला आला होता.
“हो मग, आहे ना वेळ, ये आत ये.” मनीष आत येऊन सोफ्यावर बसला. तिने आत जाऊन त्याच्यासाठी पाणी आणल.
मनीष अगदी लहान असल्यापासून ती त्याला ओळखत होती. मनीष तिसरीत असताना त्याचं कुटुंब तिच्या घराशेजारी राहायला आलं. त्याचे वडील शाळेत मुख्याधापक. आई गृहिणी. मनीष त्यांचा एकुलता एक मुलगा. एक सुखी त्रिकोणी कुटुंब.
मनीष लहानपणापासूनच खूप हुशार आणि नुसताच हुशार नाही तर चंटही. पण थोडा बुजरा. ती त्याच्यापेक्षा पाच वर्ष मोठी असली तरी त्याला घरात मोठी भावंड कोणी नसल्याने तो तिच्याकडे खेळायला येई आणि तिलाही लहान भावंड नसल्यामुळे तीही त्याला मोठ्या बहिणीसारखीच माया लावत असे. त्यामुळे इतर ठिकाणी फारसा न खुलणारा मनीष तिच्याशी मात्र मनमोकळा बोलत असे. म्हणूनच ती मनीषला फार चांगली ओळखत होती.
मनीष हातातल्या वहीकडे पाहत खाली मान घालून बसला होता. तो काहीतरी शोधल्यासारख करत असला तरी त्याच्या डोक्यात वेगळच काहीतरी चाललय हे तिला इतक्या वर्षांच्या अनुभवावरून कळत होत. ती त्याच्याकडे पाहत होती. बराच वेळ झाला तरी मनीष काही बोलेना म्हणून तीच बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तिची आई बाहेरून आली.
“मनीष बाळा, बर झाल आज इकडे आलास ते, मी आज उकडीचे मोदक करतेय, तुला आवडतात ना रे. आज इकडेच थांब जेवायला. मी येताना तुझ्या आईला सांगून आलेय.” अस म्हणत आई काही कामाने आत गेली.
आई घरात असताना मनीष काही नीट बोलणार नाही हे तिला माहित होत. म्हणून तिने मनीषशी इतर विषयांवर बोलायच टाळलं. नंतर थोडा वेळ ते दोघे अभ्यासाबद्दल बोलले.

“त्याचं कुटुंब म्हटलं तर सुखी. पैशांची वानवा कधीच नव्हती. त्यामुळे मनीषने मागितलेल त्याला कधी मिळाल नाही अस झाल नाही. पण मनीषच्या मागण्या पैशांनी तोलता येण्यासारख्या कधीच नव्हत्या. लहानपणापासूनच तो आई वडिलांच्या कौतुकाच्या शब्दाचा पारखा. कधी पहिला नंबर आला म्हणून नाचतच लहानगा मनीष घरी यावा आणि घरातलं बिघडलेलं वातावरण पाहून हिरमुसला होऊन कोपर्यात बसून राहावा अस नेहमीच घडत राहिलं. कधी चांगले गुण मिळाले म्हणून कौतुक नाही कि कधी बक्षीस मिळाल म्हणून शाबासकीची थाप नाही. “
“मग कधी मीच येत जाता त्याच्या घरात डोकावत असे तेव्हा एवढासा चेहरा घेऊन बसलेल्या मनीषचा चेहरा थोडा खुलत असे. थोडा मोठा झाला तसा कधी उदास वाटल तर तोच माझ्याकडे येऊन बसे.“
“पण आधी हातातलं बक्षीस मागे लपवणारा मनीष अवेळीच मोठा झाला आणि मनातल काहीही बाहेर येउच न द्यायला शिकला. मग तो आनंद असू देत व दुःख किंवा मग राग. मोठ होता होता मनीष माझ्यापासूनही लांब होत राहिला आणि मीही त्याला समजून घेत त्याच्या आयुष्यात फार ढवळाढवळ केली नाही. पण म्हणून मला त्याची काळजी वाट नाही अस नाही.“
“मी मघाशी बोलत होते तेव्हाही तू काहीच बोलत नव्हतास आणि आताही काहीच बोलत नाहीयेस. तू नेमका का हसतोएस मलाही कळू दे कि. “

(क्रमश:)


नेहमीप्रमाणेच घुप्प अंधार करून तो आजही रात्री उशिरापर्यंत काम करत थांबला होता. एकट बसून शांततेत काम करायला त्याला नेहमीच आवडायचं. आजही त्याच्या व्यतिरिक्त तिथे काम करणारा शंकर,  इतर काही लोक आणि बाहेर लांबवर असलेल्या दोन सुरक्षाराक्षकांशिवाय कोणी नव्हतं. निदान त्याला तरी तसंच वाटत होत.

थोड्याच वेळापूर्वी बाहेरच्या कॉफिमेकर मधली, वाफाळलेली कॉफी शंकरने आणून त्याच्या टेबलवर ठेवली होती. एरव्ही दोन दोन वेळा सांगूनही काम न ऐकणाऱ्या शंकरने आज न सांगता कॉफी आणलेली बघून त्याला जरा आश्चर्यच वाटल.  थोडा वेळ तिथेच रेंगाळत, आजूबाजूला चोरट्या नजरेने पाहत बाहेर जाताना, फार वेळ काम करत जाऊ नका नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होईल असा सल्लाही शंकरने त्याला दिला होता.

खरतर नेहमीच प्रत्येक गोष्टीत मधे मधे बोलण्याची आणि फुकटचे सल्ले देण्याची शंकरची सवय त्याला अजिबात आवडायची नाही. एरवी तो त्याच्यावर चिडला असता पण आज त्याचा उगाच चिडण्याचा मूड नव्हता. शिवाय काही अंशी शंकरच म्हणण बरोबरही होत. बऱ्याच वेळापासून तो त्याच्या समोरच्या संगणकाच्या पडद्यावर डोळे गडवून बसला होता, भान हरवल्यासारखा. पण कारणही तसच होत. ज्या क्षणांची तो इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होता ते क्षण हाकेच्या अंतराइतके जवळ आले होते. गेल्या काही दिवसांत त्याच्या आयुष्यात होत असलेल्या हालचालींना भन्नाट वेग आला होता. त्याच्या काही निर्णयांमुळे येणाऱ्या काळात बर्याच लोकांच आयुष्य कलाटणी घेणार होत.

सतत काम करून थकलेला असल्याने त्याने थोडा वेळ थांबून कॉफी प्यायला घेतली. एक एक घोट पीत असताना त्याच्या नजरेसमोर गेल्या वर्षभरात घडलेल्या सगळ्या घटना एखाद्या चित्रफितीप्रमाणे फिरत होत्या. वर्षभरापुर्वीचा तो दिवस त्याच आयुष्य बदलवणारा ठरला होता. कधी कधी आयुष्यात काही घटना घडतात आणि अगदी सरळ सोप्या मार्गाने पुढे चालत असलेलं आयुष्य नकळत वळण घेतं. काही वेळा ठरवून किंवा काही वेळा न ठरवताही माणूस वेगळ्या वाटेवरून चालायला लागतो.

त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फोटोकडे गेली. त्याच्या आई वडिलांचा तो फोटो बघून त्याच्या मनातला राग, चीड आणि सोबतच दुख सगळ्याच भावना उचंबळून आल्या. ‘काहींही झालं तरी सगळ्या गोष्टींचा निर्णय लागायलाच हवा.’ तो पुन्हा नव्या निश्चयाने कामाला लागला. ‘माझ्या प्रयत्नांना यश मिळायलाच हव.’
पण त्या संभाव्य यशाच्या उत्साहात एरव्ही सावधतेने वागणारा तो इतका बेसावध झाला होता कि आजूबाजूला घडणाऱ्या काही अनपेक्षित घटना त्याच्या नजरेतून अभावितपणे सुटल्या होत्या. त्याच्या हालचालींवर गेले काही दिवस कोणीतरी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत हे त्याच्या लक्षातच आलं नव्हत. त्याच्या तशाच बेसावधपणामुळे आताही घडणाऱ्या काही हालचाली त्याला वेळीच टिपता आल्या नाहीत.

थोडाच वेळ झाला असेल, जरा अस्वस्थ वटायला लागल म्हणून तो उठून जवळच्या खिडकीत जाऊन उभा राहिला. खिडकीतून गेटजवळ बसलेला नितीन आणि आणखी एक सुरक्षारक्षक त्याला दिसले. थंडीचे दिवस असल्याने बाहेरच्या थंड हवेमुळे त्याच्या अंगावर शिरशिरी आली. एवढ्या थंडीतही ते दोघ रात्र रात्र बाहेर काढतात याच त्याला नेहमीप्रमाणेच कौतुक वाटल. ‘आईने नितीनला घरी जेवायला बोलावलं ते बरच केल. उद्या त्याला भेटीन तेव्हा … ’

तेवढ्यात त्याला जरा जास्तच थंडी भरली. काही कळायच्या आतच अचानकच त्याच सगळ शरीर थरथर कापायला लागल. थंडीने दात अक्षरशः वाजायला लागले. मदतीसाठी हाक मारायची पण आवाजच निघेना. त्रास सहन न होऊन तो जमिनीवर पडला. आता तर त्याच सगळ शरीरच जखडल्यासारख झालं होतं.
आता आपण बहुतेक मरणार अस वाटत असतानाच लाबचा दरवाजा उघडला आणि शंकर आत आला. त्याला हायस वाटलं. आता शंकर घाबरून जवळ येणार, धावत जाऊन मदत आणणार आणि आपल्याला वाचवणार असे विचार त्याच्या मनात चालू असतानाच शंकर त्याच्या जवळ आला. पण शंकरच्या चेहऱ्यावर भीतीचा किंवा आश्चर्याचा मागमूसही नव्हता. शंकर अतिशय शांतपणे चालत चालत त्याच्याजवळ आला. त्याच्या जवळ बसला. त्याच्या त्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून घृणास्पद वाटाव असा हसला. त्याला तशा अवस्थेत पाहून एक असुरी आनंद शंकरच्या चेहऱ्यावर पसरलेला त्याला दिसला.

जिवंत राहण्याची त्याची अखेरची आशाही मावळली होती. तो तसाच तळमळत जमिनीवर पडून राहिला. त्याच्या अखेरच्या क्षणात शंकरच्या पाठोपाठ आत शिरलेले दोन लोक त्याला दिसले.

शंकरच्या पाठोपाठ आत शिरलेल्या दोघांपैकी एकाने टेबलवर ठेवलेल्या कागदांचा ताबा घेतला आणि जराही वेळ वाया न घालवता त्याच्यासोबत आलेल्या तिने संगणकाचा ताबा घेतला.

इकडे शंकरने त्याला आधीच देण्यात आलेली एक चिट्ठी त्याच्या घट्ट वळलेल्या मुठीत बळजबरीने घुसवली. त्या चिठ्ठीत कोणीतरी अस्वस्थ मनोवस्थेत स्वतःचे आयुष्य संपवत असल्याचा संदेश लिहिला होता.

(क्रमश:)