मुखपृष्ठ » माझ्या कविता

माझ्या कविता


http://jivanika-mazyakavita.blogspot.in/

 

आले मी पुन्हा, या समुद्रकिनारी
जरा गप्पा मारुयात, नेहमीसारख्या
पण  गप्पा कसल्या त्या
मीच बोलत असते सारखी
आणि तु मात्र गप्प
त्या सागराच्या साक्षीने
निवांत पणे ऐकत राहतोस सारं काही
आणि मी
होत राहते रिती
कुठेही, अगदी कुठेही वाहणारी नदी
जशी या समुद्राकडे विसावा शोधते ना
तसं, अगदी तसं
माझी सगळी सुख, दुख,
स्वप्न, अपेक्षा
सगळ्या तुझ्याचकडे विसावा शोधतात
मन कसं अगदी हलक हलक होतं.
मग,
चल, निघते मी असं म्हणून जरी मी दूर जात राहिले तरी
जशी सागराच्या ओढीने नदी वाहत येतेच,
तशी मीही परत फिरून इथेच येणार आहे
माझ्या या हक्काच्या विसाव्याकडे
हे तुला माहित असतच.
पण  एक प्रश्न मात्र नेहमीच मला सतावतो
कायमच हाकेच्या अंतरावर असणारा तु
नजरेच्या टप्प्यात मात्र कधीच का नसतोस ?
कधीच का नसत तुला नाव, चेहरा ?
असतं फक्त एक अस्तित्व
पुसटस, धुसर, तरीही जाणवणारं
असो,
नदीला तरी कुठे पुरी ओळख असते समुद्राची
तरीही ती धावतेच ना त्याच्या ओढीने
मीही येणारच आहे अशीच नेहमीच
या माझ्या स्वप्नातल्या
हक्काच्या विसाव्यापाशी
आणि
कधी न कधी दिसेलच मला तुझा चेहरा
स्पष्ट

प्रत्येक  माणसाला हवा असतो असा एक सोबती,
एक विसावा मनातलं सांगण्यासाठी, मोकळ होण्यासाठी
बऱ्याचदा हा चेहरा अस्पष्ट असतो, अंधुक असतो.
कधी त्याला आपल्याच जिवलग माणसाचा चेहरा असतो
तर कधी नीट निरखून पाहिलं तर आपलाच चेहरा त्यात दिसतो,
आणि असा माणूस जगात सर्वात एकटा असतो.

चल थोडे थोडे भांडून घेऊ
चल थोडे थोडे रुसून घेऊ
या थोडया भांडण्यात
या थोडया रुसण्यात
चल थोडे थोडे हसून घेऊ
चल थोडा थोडा अबोला करू
चल थोडा थोडा फुगवा धरू
या थोडया अबोल्यात
या थोडया फुगण्यात
चल थोडे थोडे बोलून घेऊ
या भांडण्याची दगदग फार
या रुसण्या फुगण्याचे श्रम फार
या श्रमण्या दमण्याच्या दगदगीतून
विश्रांतीचा एक क्षण चोरून घेऊ
चल, जाऊया कुठेतरी
एका शांत निवांत जागी थोडे बसून घेऊ
थोडे हसून घेऊ
थोडे बोलून घेऊ
तुझ्या माझ्या असणाऱ्या या क्षणात
थोडे थोडे जगून घेऊ
पुन्हा सुरु होईलच पाठशिवणीचा खेळ
थोडा अबोला रुसवा फुगवा साऱ्याचीच भेळ
आपण पुढेच चालत राहू
जगणे कुठेतरी मागेच सुटेल
म्हणून थांब…
मला एक वचन दे
तू येशील इथेच असाच एक क्षण चोरून
आपण असेच भेटत राहू
थोडे हसत राहू
थोडे बोलत राहू
तुझ्या माझ्या क्षणांमध्ये
थोडे थोडे जगत राहू

– जीवा

मला वाटतं,

आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.

जगात पहिल्यांदा डोळे उघडताना

वहीच पहिलं पान उघडतं

अगदी नवं कोर पान

त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात

जशी मनःपटलावर ती कोरली जातात

वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात

तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात

आयुष्य सरत असतं…

काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी

तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी

काही पानांत मोरपीस दडलेली असतात

तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात

काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते

तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते

पण काही पानं कोरीच राहतात

मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात

आयुष्य सरत जात…

आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत

मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात

सार रहस्य दडलेलं असतं

आयुष्य सरताच ते त्यात बंद होत

पुन्हा कधीही न उघडण्यासाठी

प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं.

मैत्री म्हणजे

श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ

आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ

दोन जिवांतील अनामिक ओढ

प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड

डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ

आणि कधीही घातलेली हक्काची साद

जसा मायेने भरवलेला घासभर भात

आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात

अशीच राहुदे मैत्री जन्मभर

जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर

मृगजळ

सांग रे वेड्या मना

का सत्याचा तुज भार होतो

अन् जखडून टाकणाऱ्या

स्वप्नांचा तुज आधार होतो

का क्षणभराच्या सुखासाठी

सत्याकडे फिरावतोस पाठ

आणि साधतो रात्रंदिन

त्या वेड्या मृगजळाशी संवाद

वाटत …

वाटत एकटक त्या

क्षितिजाकडे पाहाव

आणि मावळत्या सुर्याला

डोळेभरून न्याहाळाव

वाटत ऐकावा कधी

सागराचा गाज

आणि ऐकावा वाऱ्याचा

तो मंजुळ आवाज

वाटत अनोळखी रस्त्यावरून

एकटच चालत रहाव

आणि वाटेत आपणच आपल्याला

 सापडतोय का पाहाव

सोबती

जीवनाच्या वाटेवर पाऊले आपली पडत जातात

आपण पुढे जातो मागे पाऊलखुणा राहतात

प्रत्येक टप्प्यावर मागे वळून पाहताना

अनेक माणस दिसतात

त्यातली काही आपली असतात

तर काही कुणीही नसतात

पण काही कुणीही नसूनही आपली असतात

भूतकाळातल्या भाऊगर्दीत ती उठून दिसतात

त्यांच्या वाटा कुठेतरी आपल्यापासून वेगळ्या झालेल्या असतात

पण तरीही चार पावल आपण समांतर टाकलेली असतात

ती पावल आपल्यासोबत पडतात

थोडाकाळ सोबत करतात आणि वेगळी होतात

पण तरीही मनात कोरली जातात

आयुष्यात असेही काही सोबती असतात

आपल्याही नकळत ते आपल्याला घडवत जातात

आस

मिटता चुकून डोळे, तुझीच आकृती स्मरते

मग त्या क्षणांपुरती, माझीच मी न उरते

विसरून या जगाला, स्वप्नात त्या मी झुलते

दुःखास वाट देवून, सुख अंतरी येते

आहे जाणीव मलाही,क्षणभंगुर त्या सुखाची

तरीही खुळ्या मनाला, का तुझीच आस छळते

किती दिवस

किती दिवस त्याच

जुन्या गोष्टी घेऊन बसायचं

आपणच आपलं जगणं

नव्याने सुरु करायचं

जुन्या मळक्या भिंतीना

नव्याने रंग द्यायचा

वेड्या वाकड्या धुंद गाण्यात

सूर गवसला म्हणायचा

फुलपाखराच्या नाजूक पंखात

रंग नवा शोधायचा

मोगर्‍याचा धुंद सुगंध

जीवनी उतरवायचा

अशीच मी

अशीच मी अशीच मी

न जाणवे कुणाला ,न ओळखते कुणी मला

अफाट या जगात मी ,शोधते सत्याला

न सापडे ते सत्य मला ,न तोड त्या असत्याला

पण वाटतो विश्वास हा ,सापडेल सत्य मला

न संपणाऱ्या अंधारात ,सापडेल दिवा मला

किती आले किती गेले ,वाटेत या शोधत त्याला

पण न आला कधी ,सूर्य सत्याचा उदयाला

अशा न मावळो माझी कधी

मानव हा आशावादी प्राणी

अशीच मी अशीच मी

चालते सत्याची कास धरुनी

कशी वाटली कविता? थोडी कच्ची आहे पण प्रयत्न चालू आहे चांगलं लिहिण्याचा.

तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा.

आता माझ्याबद्दल सांगायचे झाले तर मी एक काहीशी अबोल म्हणजेच सगळ्यांच्या भाषेत जवळ जवळ मुकीच म्हणा कि!! पण आताशा थोडीशी बोलायला लागले आहे. मी एक अशी मुलगी आहे जी शाळेत असताना सर्वात शांत म्हणून प्रसिद्ध होते. तेही उंचीमुळे सगळ्यात शेवटी बसून देखील.  पण खर सांगायचे म्हटले तर मला बोलून व्यक्त होण्यापेक्षा, न बोलता वागणुकीतून व्यक्त व्हायला जास्त आवडत. पण ब्लॉग लिहायला लागल्यापासून बोलणे थोडे जमायला लागल आहे.
असो, मी राहायला पुण्यात (सार्थ अभिमानाने बरका !!) असून, माझे खरे नाव Jivanika नसले तरी हीच या Internet च्या अफाट जगात माझी ओळख आहे आणि तीच मला जास्त प्रिय आहे.

Advertisements

11 thoughts on “माझ्या कविता

 1. खुप छान लिहलंय तुम्ही ,
  आयुष्य म्हणजे ,
  हि कविता मला खुप आवडली,
  अपेक्षा आहे की आपण भविष्यात सुद्रधा असेच लिखाण कराल.

  • खूप आभार माझा कवितांचं एक ब्लॉग आहे तो ही जमल्यास वाचावा.
   प्रतिक्रियेकरता खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s