सामन्यांतली असामान्य माणसं


असामान्य माणस म्हटली म्हणजे आजच्या काळातली बाबा आमटे, कोल्हे दाम्पत्य, सिंधुताई वगैरे आठवतात.  अजूनही बरेच असतील.

अशा लोकांचं वर्णन करण्याचा मोह होतो. त्यांची तुलना सूर्याशी करावीशी वाटते किंवा असे म्हणता येईल कि मी करते नेहमी.

सूर्य तेजस्वी असतो. याच्या प्रकाशावर आपल्यासारखे किती जीव जगत असतात.पण म्हणून त्याच्या जवळ जाण्याच साहस कोणी करेल का? असामान्य लोकांच असच असत. जे खरच तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक आणि पर्यायाने असामान्य असतात,  त्यांच्या असामान्यत्वाचा आदर, कौतुक आपण करू शकतो. पण त्यांच्या जवळ जाऊन ते चटके सोसण्याची ताकद, हिम्मत आपल्यात आहे का? सूर्य स्वतःही जळत असतो हे आपण विसरतो.

सूर्याचे तेज लेवून, मिरवून ग्रह गोल तेजस्वी होतात. निदान तसा प्रामाणिक प्रयत्न तरी करतात. पण आपण ते तरी करू शकतो का? असामान्याची थोडी तत्त्व घेऊन ती प्रामाणिकपणे जपण्याची क्षमता आपल्यात आहे का? अगदी साध तत्त्व खोट बोलू नये पण तेही १०० टक्के पाळता येईल का आपल्याला? अशी तत्त्व पाळणाऱ्या माणसाला समाज चक्क मुर्ख अशी उपाधी लावतो आणि समाजात मुर्ख ठरून राहण्यासाठी सुद्धा हिम्मत लागते. असामान्यत्त्व लागत.

तसच या लोकांबद्दल जेवढा आदर वाटतो तेवढंच किंवा जरा जास्तच कुतूहल आणि कौतुक मला या लोकांच्या जवळच्या लोकांच, नातेवाईकांच वाटत. सूर्य प्रकाश आणि दाह वाटताना  हे पाहत नाही कोण माझा आणि कोण परका. तो सर्वाना सारखाच. तसच हि लोक पण सर्वांसाठी सारखीच असतात. उलट जवळ असणाऱ्याला चटके जास्त बसतात.

लहानपणी बऱ्याच बोधकथा वाचल्या आहेत. त्यातली एक मला नेहमी आठवते. त्यातले बारीक तपशील हरवले पण बोध अजूनही ताजा आहे.

गौतम बुद्ध आणि अंगुली नावाच्या लुटारूची कथा आहे. बऱ्याच लोकांना माहित असेल.

तर अंगुली हा लुटारू वाटसरूंना लुटायचा आणि त्यांच्या हात पायांची बोटं कापून त्यांची माळ करून गळ्यात घालायचा. एकदा बुद्ध तिथून जात असताना त्याने त्यांना पण अडवले आणि त्यांची बोट कापण्याचा प्रयत्न केला. पण बुद्धांनी त्याला अडवून एक गोष्ट करायला सांगितली. त्याला सांगितले जाऊन झाडाची पानं तोडून आण. त्याने आणली आता सांगितले ती पुन्हा जोडून ये. तो म्हणाला ते कसं शक्य आहे. यावर बुद्ध म्हणाले, ‘ जर तुला ती पानं पुन्हा जोडता येणार नाहीत तर ती तोडण्याचा तुला काय अधिकार?’

या वाक्यात खूप काही आहे. ( असामान्यत्वाची ओळख म्हणजे त्यांनी बोलावे आणि त्यांची सुवचने व्हावीत. पण जर ऐकणारा तेवढा समर्थ असेल तर.  नाहीतर कितीही बोला पालथ्या धड्यावर पाणी अस होत.)

(आपण किती बोधकथा लहानपणी आवडीने वाचल्या असतील. पण त्यातल्या किती लक्षात आहेत आणि त्यातल्या किती आपण रोजच्या जीवनात उतरवतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे.)

पण असामान्यत्व शोधायला दूरच कशाला जायला हव. नुसत ‘उघड्या’ डोळ्यांनी जरा आजूबाजूला पाहिलं कि आपल्या सारख्या सामन्यांत लपलेली असामान्य लोकं सहज नजरेस पडतात. स्वतःच्या तत्त्वांनी जगणारी. उगीच लोकांची भीड न बाळगणारी.  ज्यांच्यावर साधारणपणे विक्षिप्त असण्याचा शिक्का लागतो अशी.

मला पटतंय ना मग झाल तर. जगाची भीड का बाळगू? (पण ‘मला पटतंय ना’ याला conditions apply!! हे वाक्य सरसकट लागू होत नाही.  चांगल तेच पटल पाहिजे. वाईट गोष्टी पटता काम नये.

अशा लोकांची उदा सांगायचं म्हटलं तर काही सांगता येतील. पण त्याचं वर्णन करणं कठीण आहे. मागे सकाळ मध्ये ‘प्रेमसुख मुंदडा’ यांबद्दल वाचलं. मला या व्यक्तीत काहीतरी खास वाटलं खर. मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाहीये त्यांना पण तरीही साधारण अंदाज लागतोच. कदाचित पुणेकरांना माहित असेल त्यांच्याबद्दल. शिवाय मागे सप्तरंग मध्ये एक लेख होता वसंत वसंत लिमये नावाच्या इसमाबद्दल. वाचण्यासारखा लेख होता. त्यावर पण एक पोस्ट लिहायची आहे. असो. पण तो ज्या व्यक्तीबद्दल होता त्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीचे वडिलच जास्त वेगळे वाटले. वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यासण्यासारख.

पुन्हा मागे मी काही पोस्ट लिहिल्या होत्या. ती माणस पण मला असामान्यच वाटली. फक्त ते जगासमोर येत नाही इतकच.  जमल्यास एक नजर टाका. माणुसकी , नीतिमत्ता.

( हल्ली अस झालं कि प्रत्यक्ष न पाहता पण काही अंदाज बांधता येतात लोकांबद्दल. लोकांना वाचण्याचा अनुभव दांडगा आहे ना म्हणून. छंद म्हणून जोपासला आहे. नजर फिरवली कि लोक वाचता येतात. तशी सवयच लागली आहे मला )

Advertisements

भावलेले काही …२


जसं मागच्या पोस्ट मध्ये काही वाक्य टाकली होती तसं इथे काही माझ्या संग्रहातल्या काही चारोळ्या, कविता टाकते आहे.

माझ्या आवडत्या कवितांमध्ये पाहिलं स्थान कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितांचं अगदी पहिलं स्थान आहे. त्यांच्या बोलगाणी मधल्या कविता मला फार आवडतात. कधीही उदासवाण वाटत, निरुत्साही वाटल कि या कविता वाचते मी. मला खूप आधार दिला आहे या कवितांनी नेहमीच.

त्यातली ‘ सांगा कस जगायचं ‘ कविता खूप छान आहे.

शिवाय

‘सगळच कस होणार आपल्या मनासारख ?

आपल सुद्धा आपल्याला होत असत पारख.

निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही.

आपल दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही.’

‘कधी कधी , सगळच कस चुकत जात, नको ते हातात येत हव ते हुकत जात

अशा वेळी काय कराव?, सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्याव.’

‘आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत

डोळे उघडून पहा तरी, प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत.’

या  कविता पण अप्रतिम आहेत.

चारोळ्या

‘मला एक सुखी माणूस

त्याची दुःख सांगत बसला

आणि माझा दाटून आलेला अश्रू

मी निमुटपणे पुसला.’

‘घरात काळोख शिरेल म्हणून

मी सगळी दार लावून बसलो

आणि स्वतःच्या खुळेपणावर

अंधारात बसुन हसलो ‘

‘एक पाऊल उचललं कि

दुसर जमिनीवर टेकवाव लागत

चालण सुद्धा माणसाला

सुरुवातीला शिकव लागत’

‘खुप त्रास होतो मला

जीव कासावीस होऊन जातो

ओळखीचा कुणी समोरून जेव्हा

ओळख न दाखवता निघून जातो’

‘आळत्याच्या पानावर कसं

पाणी स्वतःला सावरून बसत

मोत्यासारख दिसण्याच्या नादात

वाहणंच हरवून बसत’

‘उंच उंच राहून कधी

आभाळही थकत

आणि कुठेतरी जाऊन मग

जमिनीला टेकत’

‘काही नाती तुटत नाहीत

ती आपल्या नकळत मिटून जातात

जशी बोटांवर रंग ठेवून

फुलपाखर हातुन सुटून जातात ‘

भावलेले काही … १


खूप वेळ अस होत कि आपण जे वाचतो, पाहतो त्यात काही तरी अस सापडत जे आपल्याला खूप आवडत, जपून ठेवावस वाटत.  बऱ्याचदा पुस्तकात खूप छान वाक्य सापडतात किंवा एखाद्या मालिकेतील पात्राच्या तोंडी काही चांगली वाक्य असतात. किंवा कधी कुठे तरी एखादी चांगली कविता, चारोळी सापडते. अस काही सापडलं कि माझ्या डायरीत टिपून ठेवायची मला सवय आहे. त्यातलच काही छान साहित्य इथे देत आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी  अशाच प्रकारची पोस्ट टाकली होती. त्यातली वाक्यही छान आहे.

‘ जेव्हा एखाद्या परिस्थितीवर हसाव कि रडाव हे कळत नाही तेव्हा पहिला पर्याय निवडावा.’

‘मला अहंकार नाही याचाही अहंकार असू नये.’

‘जगात दोन प्रकारची माणसे कधीही यशस्वी होत नसतात. एक म्हणजे सगळ्यांच ऐकणारी आणि दुसरी म्हणजे कोणाचही न ऐकणारी.’

‘प्रत्यक्षात येण कितीही अवघड असल तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका, करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा, जिथे जावस वाटेल तिथे जा … आयुष्य एकदाच मिळत आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते.’

‘स्वतःशी प्रामाणिक राहायचं म्हणजे दुसऱ्यांशी बेईमानी करावीच लागते.’

‘विचार कुठूनही घ्यावेत पण ते नीट तपासून पहावेत.’

‘A light heart lives long.’

‘Happiness means knowing that life has reality and reflection.’

मृत्युंजय‘ मधील सुरुवातीची काही वाक्य मला फार आवडलेली. पूर्ण कादंबरी अजून वाचून व्हायची आहे.

‘सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत. ते नेहमीच जस असत तसच पुढे येत असत. उगवत्या सूर्यासारख.’

‘आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात.’

माझी सगळ्यात आवडती दोन वाक्य

‘अश्रू दे दुबळ्या मनाच प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.’

‘स्वप्न म्हणजे काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष.’

शिवाय ‘युगंधरा‘ मधली वाक्य मागच्या पोस्ट मध्ये दिली आहेत तरीही इथे देते आहे.

मला खूप आवडलेलं, ‘ व्यवहाराशी विसंगत तत्त्व हे उंबराच्या फुलासारख असत. तत्त्वाच रंग रूप बघितलय कुणी? व्यवहारात त्याचा काय उपयोग?आणि हे उंबराच फुल रंगरुपासह खाली उतरलं तर ते खाऊन पोट भरेल?  ‘

‘एकमेंकाशी कुणी बोललं नाही , संघर्ष नकोत, मतभेद नकोत म्हणून बोलचाल टाळण्यासाठी भेट – नव्हे दृष्टी भेटही टाळली तरी त्यामुळे निर्माण होणारी शांतता खरी शांतता असते? अशा मूक माणसांचे श्वासही एकमेकांच्या मनात दाहकता निर्माण करतात. मनः स्वास्थ्य बिघडवतात.’

‘ वेदनेच सामर्थ्य कमी झाल कि त्याच रुपांतर दुःखात होत.’

‘सुख अस मिळत नाही, ते मिळवाव लागत.’ ‘ ज्याला स्वतःच सुख मिळवता येत नाही तो दुर्बल का?’

अशी वाक्य बरच काही शिकवून जातात.

मला आवडत माणसे वाचायला…


काही दिवसांपूर्वी fb वर प्रश्न होता तुम्हाला काय वाचायला आवडत. त्यात नेहमीचीच उत्तरे होती कथा कादंबऱ्या आत्म चरित्र वगैरे वगैरे. मलाही हे सगळ वाचायला आवडत पण याही व्यतिरिक्त माझेक आणखी उत्तर होत जे तिथे दिलं नव्हत. माणसे वाचायला. जेव्हा मी ते उत्तर तिथे नव्याने टाकल तेव्हा मला वाटल होत कि या उत्तरला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. पण बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यात जास्त संख्या मुलींची होती हे आवर्जून सांगायला हव.

हो खरच मला माणस वाचायला आवडत. लहानपणा पासूनच माझा हा छंद आहे.  मला वाटत कि जितके आपण पुस्तके वाचून समृद्ध होतो तितकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त आपण माणसे वाचल्याने समृद्ध होतो. सार्वजनिक ठिकाणी असताना जसे बस स्टोप वर असताना, बस मध्ये बसलेले असताना, दवाख्यान्यात बसलेले असताना व तसेच काही. मला माहितीये कि आज च्या या जगात कोणाकडे तितका वेळ नसतो. प्रत्येक जण खूप व्यस्त असतो पण तरीही थोडावेळ इतरत्र बघायला काय हरकत आहे. असेही खूप जणांना सवय असते कि थोडाही वेळ मोकळा मिळाला कि लगेच कानात headphone लावून गाणी ऐकत जगापासून स्वतःला वेगळ करायची. पण जो कसी थोडा वेळ मिळतो आहे तो यात वापरला तर समज वाढते आणि बऱ्याचदा चांगली करमणूकही होते.

म्हणून माझ सांगण आहे कि माणसे वाचायला शिका. यातून खूप आनंद मिळतो.

सोबती…


सोबती

जीवनाच्या वाटेवर पाऊले आपली पडत जातात

आपण पुढे जातो मागे पाऊलखुणा राहतात

प्रत्येक टप्प्यावर मागे वळून पाहताना

अनेक माणस दिसतात

त्यातली काही आपली असतात

तर काही कुणीही नसतात

पण काही कुणीही नसूनही आपली असतात

भूतकाळातल्या भाऊगर्दीत ती उठून दिसतात

त्यांच्या वाटा कुठेतरी आपल्यापासून वेगळ्या झालेल्या असतात

पण तरीही चार पावल आपण समांतर टाकलेली असतात

ती पावल आपल्यासोबत पडतात

थोडाकाळ सोबत करतात आणि वेगळी होतात

पण तरीही मनात कोरली जातात

आयुष्यात असेही काही सोबती असतात

आपल्याही नकळत ते आपल्याला घडवत जातात

एक गाणं


काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक प्रश्न होता कि २०११ चे आवडते गाणे कोणते. खर सांगायचं तर मी चांगल्या गाण्यांसाठी खूप वेडी आहे. मला खुपच आवडत गाणी ऐकायला. म्हणून चांगली मोठी लिस्ट असून सुधा मी ती लिस्ट चेक करायला सुरुवात केली आणि त्यात एक गाण सापडलं. पूर्वी कधी ऐकायला मिळाल नव्हत. पण मला ते गाण आवडल आणि साहजिकच उत्सुकतेपोटी मी त्या गाण्याचा गायक कोण आहे ते गुगल वर शोधल आणि वेगळीच कथा पुढे आली.

आधी ते गाण ऐका आणि आवडत का ते पहा. ते गाण आहे – Emptiness

या गाण्याची म्हणे नेट वर सध्या धूम आहे. ( माझ्यापर्यंत बरी येत नाही कधी). पण या मागची कथा वेगळीच आहे. खरी कि खोटी माहित नाही. या गाण्याचा गायक रोहन राठोर IIT – Guwahati चा student आहे किंवा होता.  नेट वर नुसत रोहन टाका कि लगेच सापडेल. म्हणून मी ती काही इथे देत बसत नाही. आता एक गजेंद्र वर्मा म्हणून गायक पुढे येऊन त्या गाण्यावर आपला हक्क सांगतो आहे. काहीही असो पण मला गाण खूप आवडल. कशाही मार्गाने का होईना जी प्रसिद्धी या गाण्याला मिळाली ती ते deserve करत अस मला वाटत.

त्या निमित्ताने नेहमी माझ्या मनात येणारा एक विचार मांडावासा वाटतो. मला अस वाटत कि आपल्या देशात talent खूप आहे पण समोर येत नाही. आपल्याकडे पण गायक आहेत जे फक्त national नाही तर international level वर पण आपल्या देशाच नाव मोठ करू शकतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

आपल्या चित्रपटातल्या गाण्यांमुळे अल्बम्स ना प्रसिद्धी मिळत नाही. इतर देशात चित्रपटात गाण्यांना फारस स्थान नसत. मला वाटत कि फिल्म्स मध्ये बळच गाणी घुसवल्यामुळे बऱ्याचदा मजा जाते. quality movies जवळ जवळ बनतच नाहीत आपल्याकडे. खर सांगते मला ते अक्षरश गोंधळ घातलेली गाणी नाही आवडत. ना शब्दाना अर्थ ना संगीताला. बर असही नाही कि ते गाण कथेला पूरक असत. पण अशा चित्रपट संगीतामुळे चांगले, नवीन येणारे, नवे प्रयोग करणारे गायक प्रसिद्धीस मुकतात. मग अशा मार्गाने प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न केला जातो. पण त्यात त्यांना तरी काय दोष द्यायचा. जर या गाण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी या मार्गाचा वापर केला नसता तर ते लोकांपर्यंत पोहोचल असत का? मला नाही वाटत.असो या मार्गाने एक चांगला singer समोर आला.

या गजेंद्र वर्माच आणखी एक गाण. छान आहे.

मुलगी असले .. म्हणून काय झाले?


आज खूप दिवसांनंतर पोस्ट लिहिते आहे. कसं आहे ना कि मध्ये मला वेळच मिळत नव्हता. पण आज असा विषय सापडला आहे ना कि लिहावेच लागले.

पण सगळ्यात आधी, मी काही हल्ली जे काही महिला आरक्षणाबद्दल वाद चालले आहेत त्याबद्दल पोस्त लिहीत नाहीय. खरतर त्याहीपेक्षा माझ्या आयुष्यात जे घडते आहे ते मला महत्वाचे वाटते म्हणून त्याबद्दल मी  बोलणार आहे. हा विषय आहे आमच्या शिक्षणाबद्दल.

मला एक सांगा मुलीनी शिकायचे नसते का? आणि तसे असेल तर का? असे म्हणण्याचे कारण असे कि जेव्हापासून post graduation ला आले आहे तेव्हापासून बऱ्याच जणांचे टोमणे ऐकले आहेत. (मी M.Sc. ( Chemistry) च्या पहिल्या वर्षाला आहे.)आणि तेसुद्धा चांगल्या शिकलेल्या लोकांकडून.

म्हणजे त्याचे असे झाले कि आत्ताच काही दिवसांपूर्वी आमचे super senior म्हणजे Ph.D. चे student आमचे सर आम्हाला काही reaction mechanisms समजावून सांगत होते. नंतर ते म्हणाले कि हे exam मध्ये नही पण interview ला विचारतात. अर्थात तुम्ही गेलात तर.  आणि नंतर सगळ्या मुलींकडे खुण करून म्हणाले कि या तर कोणी जाणारच नाहीत. मग आम्ही म्हटले कि का आम्ही का नाही जाणार, तर म्हणाले कि तुम्ही काही करणार नही. त्यांनी विचारले कि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांपैकी (मुले-मुली दोन्हीही )कोण कोण जोब करणार त्यांनी हात वर करा तर सगळ्या मुलीनी लगेच हात वरती केला आणि मुलांपैकी मोजून तीन चार मुलांनीच हात वर केला तर सर् म्हणाले ज्यांना हात वर करायला सांगितला त्यांनी केला नाही आणि दुसर्यानीच केला. येथे हे महत्वाचे आहे कि आमच्या वर्गात मुलींची संख्या जास्त आहे. 90 पैकी निम्म्यापेक्षा जास्त मुली आहेत.

तसेच एक आमच्या कॉलेजचा pass out student आला होता. त्याला सरांनी आम्हाला मार्गदर्शन करायला सांगितले तर त्याने किती ऐकवले. म्हणे मुली का शिकतात. उगीच मुलांची जागा अडवून ठेवतात. पुढे काही करत नाहीत. आणखी एका senior ने सुद्धा आम्हाला असेच ऐकवले. म्हणे आमच्या वर्गातल्या किती मुलींची लग्न झाली आहे. का शिकता तुम्ही?

आता मला सांगा आम्ही मुलांची जागा अडवून ठेवतो म्हणजे काय? आम्हाला काही आरक्षण नसते येथे. merit नुसार admission होते. मग मुलांचा number न लागता आमचा लागतो त्याला आम्ही काय करायचे ? आई वडील मुलींची लग्न लवकर करतात त्यात मुलींचा काय दोष? म्हणून काय आम्ही शिक्षण घ्यायचे नाही का ? तुम्हाला काय वाटते?