अपूर्ण …


“सई सई उठ तुझा फोन वाजतोय. उठ लवकर.” तिला झोपेतच आईचा आवाज ऐकू आला.
आधी आई काहीतरी बोलतेय एवढच तिला कळल, शब्द कळून त्यांचा अर्थ लागायला थोडावेळ गेला. नंतर ती धडपडत उठली पण तोपर्यंत फोन बंद झाला होता. तिने फोन पहिला तर क्लास मधून फोन होता. तिने लगेच परत फोन लावला. पलिकडून मानसी बोलत होती. आजचा क्लास एक तास लवकर होणार आहे, लवकर ये अस सांगायला तिने फोन केला होता. तिने घड्याळात पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते. एक तास लवकर म्हणजे चार वाजता क्लास होणार. क्लासला पोहोचायलाच अर्धा पाउण तास लागणार. म्हणजे तीन वाजताच निघावं लागणार. ती जराशी चरफडतच उठली. नेहमीच आहे हे. अगदी वेळेवरच सांगतात नेहमी वेळ बदलल्याच. आधी नाही का सांगता येत. आता तयारी करायलाही वेळ मिळणार नाही. जाताना बसमधे वाचव लागणार. तिने चेहऱ्यावर थंड पाणी मारलं. भर उन्हाळ्याची रखरखीत दुपार. त्यात केव्हाची लाईट गेलेली. गरमीने आणि घामाने जीव अगदी नकोसा झालेला. त्यात पुन्हा गेल्या रात्र भरच जागरण. गेले वर्षभर ती प्रशासकीय सेवेसाठी मान मोडून अभ्यास करत होती. तिची चरफड साहजिकच होती.
नशिबाने आज बस लगेचच मिळाली. पोहोचायला वेळ होता म्हणून ती पुस्तक काढून बसली. थोडा वेळ झाला असेल वाचायला घेऊन तेवढ्यात कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज यायला लागला. मागच्या सीटवर कोणीतरी येऊन बसल असाव. तिने वळून पाहिलं नाही पण बहुतेक काही मित्र मैत्रिणींचा ग्रुप असावा. त्यांच्या बोलण्यावरून ते कुठे तरी फिरायला जायचा प्लान बनवत असावेत असा अंदाज तिने लावला. तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. तरी कानावर आवाज पडणारच, मेंदू त्यांचा अर्थ लावणारच आणि मग त्याचा नेहमीचाच उद्योग सुरु होणारच.
“किती सोप्पय ना रे तुमच्यासारख्यांच जगण. हव तेव्हा हव ते करायचं, हव तसं जगायचं. जस पक्ष्यांना हव तेव्हा हव तितक्या वेळ आकाशात उडता येत. तुमच्यासारख्यांच आकाश या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेलं, अमर्याद. आमच तसं नसत. आमच्या आकाशाला खूप मर्यादा पडतात. आमच आकाश छोटस, खिडकीतून दिसणाऱ्या छोट्याशा तुकड्या एवढ. तेव्हढ्याच आकाशात उडायचं चिटपाखरू होऊन, तेही जमल तरच. नाही तर तुमच्यासारख्यांना पाहायचं उडताना.“
थोडा वेळाने हसण्या खिदळण्याचा आवाज बंद झाला. त्यांना खाली उतरण्याची घाई असावी म्हणून ते सगळे बसच्या पुढच्या दाराकडे गेले आणि बस थांबताच खाली उतरले. बस पुढे गेली तशी तिने तिच्या पुस्तकाकडे नजर वळवली. पुढचा अर्धा तासात निदान एकदा तरी सगळ वाचून व्हायला हवं होतं. मुलांना शिकवण्याआधी शिकवणार्याला तर यायला हव ना सगळ.
ती क्लास मध्ये पोहोचली तेव्हा पाऊणे चार वाजले होते. क्लास सुरु व्हायला अजून १५ मिनिट बाकी होते. अजून वर्ग बराच रिकामा होता. पण काही मुल येऊन बसली होती. त्यातली काही अभ्यास करत होती आणि इतर गप्पा मारत बसली होती.
ती आत गेली तशी मुलांची आपापसातल्या गप्पांची भुणभुण बंद झाली. तिच्याशी गप्पा मारायला मुल नेहमीच उत्सुक असत, त्यातल्या त्यात अभ्यासू मुल जास्तच. ते तिच्याकडे अडलेले प्रश्न घेऊन येत आणि ती सोडवून द्यायला मदत करत असे. कधी कधी तर काही त्यांचे वैयक्तिक प्रश्नही तिला विचारत आणि ती त्यानाही जमेल तशी नीट उत्तरं देत असे. प्रश्न कोणताही असो, कितीही गुंता असू देत त्याला मोकळ करण्यात तिची हातोटी होती. अगदी सोप्या शब्दात तिला समजावून सांगता येत असे. म्हणूनच ती क्लास मध्ये विद्यार्थ्यांची आवडती होती.
आत जाता जाता तीच मनिषकडे लक्ष गेलं. कोणाचही फारस लक्ष जाणार नाही अशा शेवटच्या बाकावर बसून त्याच मोबाईलवर कोणाशी तरी बोलण चालू होत. तिने आत जाताच तिच्या हातातल्या वस्तू तिथल्या टेबल वर ठेवल्या. सगळ्यांकडे पाहून प्रसन्न हसली आणि ती मुलांमधल्या एका बाकावर जाऊन बसली. काही मुली लगेच तिच्याकडे वही घेऊन आल्या आणि तिच्या शेजारच्या बाकावर बसल्या. एक एक करून त्या तिला प्रश्न विचारत होत्या आणि ती त्यांना उत्तर देत होती. मधून मधून काही गोष्टींवर त्याचं हसणं खिदळणही चालू होत. तिच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक मोकळं मैत्रीच नात तिने जपल्याच कोणालाही कळल असत. हळू हळू इतरही मुल येऊन त्यांच्यात मिसळली.
प्रश्न सोडवता सोडवताही ती मधूनच एक नजर मनिषकडे टाकत होती. त्याच अजूनही फोनवर बोलण चालूच होत. ती त्याच्याकडे पाहतेय याकडे त्याच अजिबात लक्ष नव्हतं. एवढच काय आजूबाजूला चालू असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे त्याच अजिबात लक्ष नव्हत.
चार वाजत आले तशी ती उठली. तोपर्यंत सगळे विद्यार्थी आले होते आणि क्लास पूर्ण भरला होता. तिने फळा स्वच्छ पुसला आणि आज शिकवायचा विषय लिहायला सुरुवात केली. वर्गातली कुजबुज बंद होऊन सगळे आपापल्या वह्या पेन वगैरे काढून सरसावून बसले होते. ती वळली आणि तिने एकदा सगळ्यांकडे एक नजर फिरवली. एव्हाना मनीषही भानावर येऊन वही वर काढून बसला होता.

ती घरी आली तेव्हा आई बाहेर जाण्याच्या तयारीतच होती. आई बाहेर गेली तसा तिने तिच्यासाठी तयार करून ठेवलेला चहा उकळून घेतला आणि बाल्कनीत येऊन उभी राहिली. खर तर एरव्ही दोन तास क्लास आणि साधारण एक तासाचा प्रवास करून आल्यावरही तिला कधी थकवा जाणवत नसे. उलट क्लास मधून आल्यावर तिला मोकळ वाटत असे. तिच्यात आणि त्या मुलांत जवळ जवळ पाच वर्षाचं अंतर होत. पण तिथे शिकवायला लागल्याच्या काही महिन्यांच्या काळातच सगळ्यांशी तिची छान गट्टी जमली होती. त्यांच्यात जाऊन ती तीच वय विसरून, त्यांच्यात त्यांच्यासारख होऊन वावरत असे.
पण आज मात्र तिला जरा थकवा जाणवत होता. शारीरिक नव्हे पण मानसिक. गेल्या काही दिवसांपासून मनीषच बदललेलं वागण तिला खटकत होतं. त्याच ते सारख भान हरवल्यासारख फोन वर बोलत राहण, वर्गात नीट लक्ष न देण. त्याच्याविषयी इतर काही शिक्षकांकडून ऐकायला मिळालेल्या तक्रारी तिला आणखीनच अस्वस्थ करत.
“आजच मानसी सांगत होती काल मनीष तिच्या तासाला शेवटच्या बाकावर बसून काही तरी वेडवाकड बोलत होता आणि सगळी मुल त्याच्या बोलण्याला साद म्हणून फिदी फिदी हसत होती. हल्ली त्याच वागण खूपच विचित्र होत चाललय. मला त्याची फार काळजी वाटायला लागलीय.”
“असा नव्हता तो आधी. अगदी लहान होता तेव्हापासून ओळखते मी त्याला. मला माहितीये तो असा नाहीचे. आधी कधी साध उलट उत्तर देताना पाहिलं नाहीये मी त्याला. मग आता अचानकच गेल्या काही दिवसात अस काय बदललं असाव.”
“त्याच्या बद्दल त्याच्या कॉलेज मधूनही तक्रारी आल्याच काकू सांगत होत्या. हातचा सुटत चाललाय पोरगा म्हणत होत्या. त्याच्याशी बोलण्याचाही काही उपयोग होत नाही म्हणे. हल्ली घरातही फार थांबत नाही. अभ्यासच तर लांबच राहिलं. मला म्हणाल्या तू बोलून पहा, पहा तुला काही सांगतो का ते.”
“आज तू काही बोलणार नाहीएस का? मी एकटीच बडबडतेय किती वेळापासून. तू काहीच बोलत नाहीयेस. नुसता हसतोएस काय गालातल्या गालात.“
तेवढ्यात दाराची बेल वाजली. आई आली असावी बहुदा असा विचार करत तिने दार उघडल तर समोर मनीष. हातात वही घेऊन उभा होता.
साधारण १५ – १६ वर्षांचा गोरा गोमटा मुलगा. नुकताच मिसरूड फुटायला लागलेलं. नाकावर अगदी लहान वयापासून असलेला चष्मा त्याच्या अभ्यासुपणाच
“मनीष, आज इकडे?”
“काही नाही ग ताई, थोडं अभ्यासच अडलं होतं ते विचारायला आलो होतो. आहे ना वेळ तुझ्याकडे?” तिला जरा आश्चर्यच वाटल. आज बर्याच दिवसांनी मनीष तिच्याकडे अभ्यासाचा अडलेल विचारायला आला होता.
“हो मग, आहे ना वेळ, ये आत ये.” मनीष आत येऊन सोफ्यावर बसला. तिने आत जाऊन त्याच्यासाठी पाणी आणल.
मनीष अगदी लहान असल्यापासून ती त्याला ओळखत होती. मनीष तिसरीत असताना त्याचं कुटुंब तिच्या घराशेजारी राहायला आलं. त्याचे वडील शाळेत मुख्याधापक. आई गृहिणी. मनीष त्यांचा एकुलता एक मुलगा. एक सुखी त्रिकोणी कुटुंब.
मनीष लहानपणापासूनच खूप हुशार आणि नुसताच हुशार नाही तर चंटही. पण थोडा बुजरा. ती त्याच्यापेक्षा पाच वर्ष मोठी असली तरी त्याला घरात मोठी भावंड कोणी नसल्याने तो तिच्याकडे खेळायला येई आणि तिलाही लहान भावंड नसल्यामुळे तीही त्याला मोठ्या बहिणीसारखीच माया लावत असे. त्यामुळे इतर ठिकाणी फारसा न खुलणारा मनीष तिच्याशी मात्र मनमोकळा बोलत असे. म्हणूनच ती मनीषला फार चांगली ओळखत होती.
मनीष हातातल्या वहीकडे पाहत खाली मान घालून बसला होता. तो काहीतरी शोधल्यासारख करत असला तरी त्याच्या डोक्यात वेगळच काहीतरी चाललय हे तिला इतक्या वर्षांच्या अनुभवावरून कळत होत. ती त्याच्याकडे पाहत होती. बराच वेळ झाला तरी मनीष काही बोलेना म्हणून तीच बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तिची आई बाहेरून आली.
“मनीष बाळा, बर झाल आज इकडे आलास ते, मी आज उकडीचे मोदक करतेय, तुला आवडतात ना रे. आज इकडेच थांब जेवायला. मी येताना तुझ्या आईला सांगून आलेय.” अस म्हणत आई काही कामाने आत गेली.
आई घरात असताना मनीष काही नीट बोलणार नाही हे तिला माहित होत. म्हणून तिने मनीषशी इतर विषयांवर बोलायच टाळलं. नंतर थोडा वेळ ते दोघे अभ्यासाबद्दल बोलले.

“त्याचं कुटुंब म्हटलं तर सुखी. पैशांची वानवा कधीच नव्हती. त्यामुळे मनीषने मागितलेल त्याला कधी मिळाल नाही अस झाल नाही. पण मनीषच्या मागण्या पैशांनी तोलता येण्यासारख्या कधीच नव्हत्या. लहानपणापासूनच तो आई वडिलांच्या कौतुकाच्या शब्दाचा पारखा. कधी पहिला नंबर आला म्हणून नाचतच लहानगा मनीष घरी यावा आणि घरातलं बिघडलेलं वातावरण पाहून हिरमुसला होऊन कोपर्यात बसून राहावा अस नेहमीच घडत राहिलं. कधी चांगले गुण मिळाले म्हणून कौतुक नाही कि कधी बक्षीस मिळाल म्हणून शाबासकीची थाप नाही. “
“मग कधी मीच येत जाता त्याच्या घरात डोकावत असे तेव्हा एवढासा चेहरा घेऊन बसलेल्या मनीषचा चेहरा थोडा खुलत असे. थोडा मोठा झाला तसा कधी उदास वाटल तर तोच माझ्याकडे येऊन बसे.“
“पण आधी हातातलं बक्षीस मागे लपवणारा मनीष अवेळीच मोठा झाला आणि मनातल काहीही बाहेर येउच न द्यायला शिकला. मग तो आनंद असू देत व दुःख किंवा मग राग. मोठ होता होता मनीष माझ्यापासूनही लांब होत राहिला आणि मीही त्याला समजून घेत त्याच्या आयुष्यात फार ढवळाढवळ केली नाही. पण म्हणून मला त्याची काळजी वाट नाही अस नाही.“
“मी मघाशी बोलत होते तेव्हाही तू काहीच बोलत नव्हतास आणि आताही काहीच बोलत नाहीयेस. तू नेमका का हसतोएस मलाही कळू दे कि. “

(क्रमश:)

Advertisements


नेहमीप्रमाणेच घुप्प अंधार करून तो आजही रात्री उशिरापर्यंत काम करत थांबला होता. एकट बसून शांततेत काम करायला त्याला नेहमीच आवडायचं. आजही त्याच्या व्यतिरिक्त तिथे काम करणारा शंकर,  इतर काही लोक आणि बाहेर लांबवर असलेल्या दोन सुरक्षाराक्षकांशिवाय कोणी नव्हतं. निदान त्याला तरी तसंच वाटत होत.

थोड्याच वेळापूर्वी बाहेरच्या कॉफिमेकर मधली, वाफाळलेली कॉफी शंकरने आणून त्याच्या टेबलवर ठेवली होती. एरव्ही दोन दोन वेळा सांगूनही काम न ऐकणाऱ्या शंकरने आज न सांगता कॉफी आणलेली बघून त्याला जरा आश्चर्यच वाटल.  थोडा वेळ तिथेच रेंगाळत, आजूबाजूला चोरट्या नजरेने पाहत बाहेर जाताना, फार वेळ काम करत जाऊ नका नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होईल असा सल्लाही शंकरने त्याला दिला होता.

खरतर नेहमीच प्रत्येक गोष्टीत मधे मधे बोलण्याची आणि फुकटचे सल्ले देण्याची शंकरची सवय त्याला अजिबात आवडायची नाही. एरवी तो त्याच्यावर चिडला असता पण आज त्याचा उगाच चिडण्याचा मूड नव्हता. शिवाय काही अंशी शंकरच म्हणण बरोबरही होत. बऱ्याच वेळापासून तो त्याच्या समोरच्या संगणकाच्या पडद्यावर डोळे गडवून बसला होता, भान हरवल्यासारखा. पण कारणही तसच होत. ज्या क्षणांची तो इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होता ते क्षण हाकेच्या अंतराइतके जवळ आले होते. गेल्या काही दिवसांत त्याच्या आयुष्यात होत असलेल्या हालचालींना भन्नाट वेग आला होता. त्याच्या काही निर्णयांमुळे येणाऱ्या काळात बर्याच लोकांच आयुष्य कलाटणी घेणार होत.

सतत काम करून थकलेला असल्याने त्याने थोडा वेळ थांबून कॉफी प्यायला घेतली. एक एक घोट पीत असताना त्याच्या नजरेसमोर गेल्या वर्षभरात घडलेल्या सगळ्या घटना एखाद्या चित्रफितीप्रमाणे फिरत होत्या. वर्षभरापुर्वीचा तो दिवस त्याच आयुष्य बदलवणारा ठरला होता. कधी कधी आयुष्यात काही घटना घडतात आणि अगदी सरळ सोप्या मार्गाने पुढे चालत असलेलं आयुष्य नकळत वळण घेतं. काही वेळा ठरवून किंवा काही वेळा न ठरवताही माणूस वेगळ्या वाटेवरून चालायला लागतो.

त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फोटोकडे गेली. त्याच्या आई वडिलांचा तो फोटो बघून त्याच्या मनातला राग, चीड आणि सोबतच दुख सगळ्याच भावना उचंबळून आल्या. ‘काहींही झालं तरी सगळ्या गोष्टींचा निर्णय लागायलाच हवा.’ तो पुन्हा नव्या निश्चयाने कामाला लागला. ‘माझ्या प्रयत्नांना यश मिळायलाच हव.’
पण त्या संभाव्य यशाच्या उत्साहात एरव्ही सावधतेने वागणारा तो इतका बेसावध झाला होता कि आजूबाजूला घडणाऱ्या काही अनपेक्षित घटना त्याच्या नजरेतून अभावितपणे सुटल्या होत्या. त्याच्या हालचालींवर गेले काही दिवस कोणीतरी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत हे त्याच्या लक्षातच आलं नव्हत. त्याच्या तशाच बेसावधपणामुळे आताही घडणाऱ्या काही हालचाली त्याला वेळीच टिपता आल्या नाहीत.

थोडाच वेळ झाला असेल, जरा अस्वस्थ वटायला लागल म्हणून तो उठून जवळच्या खिडकीत जाऊन उभा राहिला. खिडकीतून गेटजवळ बसलेला नितीन आणि आणखी एक सुरक्षारक्षक त्याला दिसले. थंडीचे दिवस असल्याने बाहेरच्या थंड हवेमुळे त्याच्या अंगावर शिरशिरी आली. एवढ्या थंडीतही ते दोघ रात्र रात्र बाहेर काढतात याच त्याला नेहमीप्रमाणेच कौतुक वाटल. ‘आईने नितीनला घरी जेवायला बोलावलं ते बरच केल. उद्या त्याला भेटीन तेव्हा … ’

तेवढ्यात त्याला जरा जास्तच थंडी भरली. काही कळायच्या आतच अचानकच त्याच सगळ शरीर थरथर कापायला लागल. थंडीने दात अक्षरशः वाजायला लागले. मदतीसाठी हाक मारायची पण आवाजच निघेना. त्रास सहन न होऊन तो जमिनीवर पडला. आता तर त्याच सगळ शरीरच जखडल्यासारख झालं होतं.
आता आपण बहुतेक मरणार अस वाटत असतानाच लाबचा दरवाजा उघडला आणि शंकर आत आला. त्याला हायस वाटलं. आता शंकर घाबरून जवळ येणार, धावत जाऊन मदत आणणार आणि आपल्याला वाचवणार असे विचार त्याच्या मनात चालू असतानाच शंकर त्याच्या जवळ आला. पण शंकरच्या चेहऱ्यावर भीतीचा किंवा आश्चर्याचा मागमूसही नव्हता. शंकर अतिशय शांतपणे चालत चालत त्याच्याजवळ आला. त्याच्या जवळ बसला. त्याच्या त्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून घृणास्पद वाटाव असा हसला. त्याला तशा अवस्थेत पाहून एक असुरी आनंद शंकरच्या चेहऱ्यावर पसरलेला त्याला दिसला.

जिवंत राहण्याची त्याची अखेरची आशाही मावळली होती. तो तसाच तळमळत जमिनीवर पडून राहिला. त्याच्या अखेरच्या क्षणात शंकरच्या पाठोपाठ आत शिरलेले दोन लोक त्याला दिसले.

शंकरच्या पाठोपाठ आत शिरलेल्या दोघांपैकी एकाने टेबलवर ठेवलेल्या कागदांचा ताबा घेतला आणि जराही वेळ वाया न घालवता त्याच्यासोबत आलेल्या तिने संगणकाचा ताबा घेतला.

इकडे शंकरने त्याला आधीच देण्यात आलेली एक चिट्ठी त्याच्या घट्ट वळलेल्या मुठीत बळजबरीने घुसवली. त्या चिठ्ठीत कोणीतरी अस्वस्थ मनोवस्थेत स्वतःचे आयुष्य संपवत असल्याचा संदेश लिहिला होता.

(क्रमश:)

A Perfect Getaway


Image

सायको थ्रिलर मूवी आहे. म्हणून फार उलगडून सांगण्यात मजा नाही.

एक नुकतंच लग्न झालेलं कपल, Cliff आणि Cydney हवाई इथे हैकिंगसाठी जातात. वाटेत त्यांना Nick भेटतो जो Cydney ला उंचावरून खाली पडण्यापासून वाचवतो. नंतर त्याची मैत्रीण सुद्धा यांना येऊन मिळते. हे चौघे आता सोबत असतात. वाटेत त्यांना एका कपलच्या मर्डरची माहिती कळते. खुनी खून केल्या नंतर प्रेताचे दात आणि बोटं काढून स्वतः कडे ठेवत असतो असही कळत.

हे ऐकून त्यांना येताना जे विचित्र कपल भेटल होत त्याची आठवण होते. ते लिफ्ट मागत असताना ते संशयास्पद दिसत असल्यामुळे त्यांना Cliff आणि Cydney यांनी लिफ्ट द्यायला नकार दिलेला असतो. आता तेच खुनी असावेत असा संशय Cliff ला यायला लागतो. योगायोगाने तेच दोघ आता या चौघांना वाटेत भेटतात. क्लीफ्फ चोरून त्यांचं समान चेक करतो. त्यात त्याला दात सापडतात. शिवाय त्याला शंका यायला लागते की लिफ्ट नाकारल्यामुळे चीडल्याने ते दोघ त्यांना मारण्यासाठी त्यांचा पाठलाग करत असावेत. तो घाबरतो.

पण नंतर काही वेळाने त्यांना पोलीस त्या दोघांना पकडून नेताना दिसतात आणि क्लीफ्फ निश्चिंत होतो. आता सगळ व्यवस्थित चाललेलं असताना खऱ्या अर्थाने थ्रील सुरु होत. ते प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.

कलाकारांनी खूप छान काम केलं आहेच पण मला सगळ्यात जास्त Cliff म्हणजे Steve Zahn चा काम आवडलं. का ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हास्य

चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.

http://www.youtube.com/watch?v=0Mk8ZJJEYPE

(Trailer खालच्या कमेंट्स वाचू नका pls. उगाच मजा जाईल)

काटेरी


काटेरी – सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकरांची मी वाचलेली ही पहिली कादंबरी.

खर तर त्यांच्या लेखनाबद्दल फार काही माहित नसल्याने कोणताही पूर्वग्रह ना ठेवता मी ही कादंबरी वाचायला घेतली आणि अगदी काही तासांत संपवली.

मी प्रत्येक पुस्तकातून आवडलेल्या काही ओळी परिच्छेद टिपून ठेवते. या कादंबरीतल्या काही ओळी खूप आवडल्या म्हणून टिपून ठेवल्या.

‘ सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून आपण त्यांची दुःख उसनी घेत असतो. हे वाईट आहे. म्हणजे … आपल्या विवंचना आपल्याला कमी असतात का ? पण माणूस उत्सुकते पोटी, कुतूहलापोटी दुसऱ्याचा रोग आपल्याला लावून घेत असतो. बघ तुला आधी शेखर पालेकर माहीतच नव्हता, तेव्हा तुझ्या मनच कण अन् कण स्वतःभोवती फिरत होता . पण पालेकरशी ओळख होताच, चार दोन कण स्वत्व विसरून पुसटपणे त्याचा विचार करू लागले. ‘

‘ वर्षानु वर्षे संबंधित असलेले नातेवाईक कधी कधी परकेच राहावेत नी चार तासांच्या प्रवासात झालेल्या ओळखीवर एखादा परका ऋणानुबंधित होऊन जावा.’

‘एखादी गोष्ट घडावी नी अमुक पद्धतीन घडावी असं आपण ठरवीत असतो. ती तशी घडली नाही तर वाईट वाटत. मनातल्या मनात आपलं घोर अपमान होतो. माग ती तशी का घडली नसेल याच कारणही आपणच ठरवून टाकत असतो की अस अस झालं असणार. नाहीपेक्षा आपण म्हटलं तसच झालं असतं. तेही खोट ठरलं तर किती वाईट वाटत ना ‘

Dangerous Minds


वर्ष :1995

दिग्दर्शक : John N. Smith

कथाकार / लेखक: Based on ‘My Posse Don’t Do Homework’ by LouAnne Johnson (a retired U.S. Marine)

कलाकार: Michelle Pfeiffer and others

एका retired U.S. Marine ला एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळते. पण तिथे गेल्यानंतर तिला कळत  की जो वर्ग तिला देण्यात आला आहे तो एक समाजातल्या गरीब, शिक्षणाबद्दल आस्था नसलेल्या, ड्रग्स वगैरे च्या आहारी गेलेल्या म्हणजे एकंदरीत ‘वाया गेलेल्या’ मुलांचा वर्ग आहे. या मुलांना शिकवणं खूप कठीण काम आहे हे तिला पहिल्याच दिवशी कळत.
पण ती कशी त्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करते, त्यांच्यात त्यांच्यासारख होऊन त्यांना बदलवायचा प्रयत्न करते हे बघण्यासारख आहे.
ती आधी त्या मुलांना कराटे शिकवून त्यांच्याशी मैत्री करते. त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी त्यांना थोडं आमिष दाखवते, कधी चॉकलेट्स देते तर कधी फिरायला घेऊन जाते तेही स्वखर्चाने. त्यांना कविता शिकवताना तिने वापरलेल्या ट्रिक्स पण छान आहेत.
अशा ‘वाया गेलेल्या’ मुलांशी कुणी प्रेमाने, समजून घेऊन वागलं तर तीही सुधारू शकतात हे दाखवलं आहे.
या दरम्यान शिक्षण व्यवस्था कशी उदासीन असते अशा मुलांबद्दल हे पण खूप छान पद्धतीने दाखवलं आहे.
उदा. वर्गातला सर्वात टारगट मुलगा एका अडचणीत सापडतो. त्याला कोणीतरी जीवे मारण्याची धमकी देतं. मी जर त्या माणसाला मारलं नाही तर तो मला मारेल असं म्हणून तो मुलगा त्याला मारायचं ठरवतो. पण ती त्याला तसं करू देत नाही. त्याला घरी घेऊन जाते. त्याला समजावते की हीच वेळ आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याची. शाळेच्या मुख्याध्यापकांना सगळ सांगून त्यांची मदत माग. तो मुलगा सकाळी तिला न सांगता घरातून निघून जातो. नंतर तिला कळत की तो शाळेत गेला होता मदत मागण्यासाठी पण त्याला तिथून हाकलून लावण्यात आलं. कारण काय तर त्याने आत केबिनमध्ये जाताना दारावर नॉक केल नाही. नंतर त्या मुलाचं प्रेत सापडत.
या प्रसंगामुळे ती खूप अस्वस्थ होते. ती नोकरी सोडायचं ठरवते. पण ती मुलं तिला तिथून जाऊ देत नाहीत.
बघण्यासारखा चित्रपट आहे.

हा चित्रपट My Posse Don’t Do Homework या LouAnne Johnson (a retired U.S. Marine) यांच्या autobiography वर आधारित आहे.

//

//

//

बांडगुळ


नकोय मला आधार

आधार मिळाला ना की बांडगुळ व्हायला होतं
आधाराला जखडून जायला होतं
प्रत्येक नवी पालवी फुटण्याआधी
आधाराकडे आशेने पहावं लागतं
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
नाही तर आधार देता देता
आधार वृक्षच कोलमडून पडायचा
मग त्यावर जगणारं बांडगुळ तरी
कसं उभं राहणार
म्हणून
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
तुला बहरताना पहायचय
आणि माझा आधार मात्र मलाच व्हायचय

-जीवा

अज्ञानी


मला अज्ञानीच राहू दे
अर्थ नको सांगूस लावायला
अर्थ न लावता
शिकायचय मला जगायला
बेधुंद होऊन चालायला
ठेचकाळले तरी पुन्हा उठायला
आणि वेड्यासारख पुन्हा
त्याच मार्गावरून चालायला
कुणी वेड म्हटलं तरी
त्यावर वेड्यासारख हसायला
पण नको सांगूस मला
त्या वेडेपणामागचा अर्थ मात्र शोधायला